आपल्या आयुष्यातील स्वप्नाचा गळा दाबून, प्रत्येक क्षण दुसर्‍या साठी जगणं खर अवघड आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रत्येकासाठी, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपले आई वडील, भाऊ - बहीण, काका-काकू, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, त्यांच्या असंख्य स्वप्नांचा मनातल्या मनात खून करतात. स्वतः च स्वप्नं विसरून तुमच्या स्वप्नांत रममाण होतात. म्हणजे तुमच्या स्वप्नाला त्यांच्या त्यागाचा फुलस्टॉप लागल्या शिवाय तुमचं स्वप्नं पूर्ण होत नाही.
                तुम्ही लहान गांव बघितले असेलचं. पक्या रस्त्यापेक्षा पाऊल वाटा जास्त, काही घरे पक्की, काही घरे मातीचे, काही गवताच्या झोपड्या, त्या बाहेर खेळणार नग्न मुले, एकदम महाकाय, विशाल, पिंपळाचे किंवा वडाचे झाड, त्याखाली बिडी ओढून, तंबाकू खाऊन, गप्पा गोष्टीमध्ये रंगलेला लोकांचा पार. असचं हे एक गांव होत. त्या गावातील हा प्रसंग आहे. या गावातील लहान-सहान येणार्‍या मातीची निमुळत्या पायवाटा मधुन एक पायवाट मुख्य डांबरी रोडला मिळत होती.अशाच निमुळत्या पायवाटे वरुन चिखल तुडवत आलेला गोपाल. काँलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत बसस्टाँप वर थांबला. गावाकडे बसस्टाँप म्हणजे एखादं पटकन लक्षात येणारं मोठ झाड किंवा एखादी पान टपरी किंवा न्हावी यांच दुकान. या गावात त्यापैकी एक मोठ वडाचा झाडं. गोपाल ही वडाच्या झाडाखाली थांबला होता. नुकताच पाऊस पडल्याने वातावरण एकदम प्रसन्न, मनाला अल्हादायक वाटणारी जणू हिरवी शाल त्यांनी अंगावर घेवून, सगळी भूमि हिरवीगार केली. अस वाटत होतं. तरीही त्यात अजून मेघ थोडे दाटलेलेच होते. पाऊस येवून गेला त्यामुळे बसस्टाँप वर नावाला काळ कुत्रं पण नव्हतं.


       तेवढयात एक 58 ते 60 वर्षाचे गृहस्थ हातात, लाल पिशवी जी या हिरव्या वातावरणात उठून दिसत होती. खिशाला पेन लावून होता. त्यामुळे तो साक्षर आहे याची जाणीव होत होती. चूरघड्या पडलेल्या पांढऱ्या शर्टच्या खिशाला तंबाखूचे पिवळे डाग उठून दिसत होते. पायाची गरज भागवणारी चप्पल,थोडी फाटलेली - तुटलेली, पण तशीच शिवलेली. ऊन पाणी खाऊन जश्या जमिनीला भेगा पडतात. तश्याच शेतात कष्ट करुन टाचेला एकदम ठळक पडलेल्या भेगा .चेहरा माञ खिन्न, उदास, हताश, चिंतेने ग्रासलेला. डोळ्यात दाटलेल्या मेघा पेक्षा ही स्पष्ट, दाटलेलं दुःख दिसतं होते. आलेल्या पावसाने भिजलेला वटा त्यावरील थेंब हातानी पुसून, पिशवी बाजूला ठेवून ते गृहस्थ वडाखाली बसले.तशी गोपाल ने त्यांच्याकडे एक नजर टाकली. आणि भिजलेल्या वट्यावर त्यांच्या बाजुला थोडी जागा राखुन तो ही बसला. गाडी अजून आली नाही बघून, खिशातील मोबाईल काढून त्यावर गेम खेळण्यात तो गुंतला. त्यात पाखरांची सारखी किलबिल, निरव शांतता, अंगाला शहारे आणणारा थंडगार वारा. याचा त्याला विसर पडला आणि मोबाईल मधील गेम मध्ये लीन झाला.
अचानक मुसुमुसु रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. परंतु तो गेम खेळण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांनी आधी लक्ष दिले नाही. पण सारखा मुसमुसू आवाज कानावर पडत होता. म्हणुन गोपाल ने लगेच बाजुला वळुन पाहिले. बाजुचे गृहस्थ , हुंदके आवरण्यासाठी गळ्यात गुंफलेला मळकट शेला तोंडावर दाबत होते. त्यामुळे आवाज काही प्रमाणात दबत होता. मात्र डोळ्यातुन  असंख्य धारा झर्‍या प्रमाणे घळाघळा वाहत होत्या. गोपाल त्यांना बघुन एकदम अस्वस्थ झाला. मोबाईल मधील गेम पटकन बंद केला. व खिशात ठेवुन तो त्यांच्याकडे सरकला.
गोपाल - काका, काय झालं ? तसे ते गृहस्थ एकदम भानावर आले. दुःखात एकदम विसर पडला की, तो बाहेर बसुन आहे. मग जाणीव होताचं. त्याचं मळकट शेल्याने डोळे पुसुन काहीनाही- काहीनाही अस करुन फक्त मान हलवली.
गोपाल(राहवलं नाही म्हणुन) - काका , कुणी काही बोलल का ? भांडण झालय का ?तरीही काका नुसती मान हलवत होते.
गोपाल -कुणाची आठवण येतेय का ? अस म्हणताचं गृहस्थाचे  साठलेले दुःख एकदम अनावर झाले. जसं एकादा बाळ आपल्या आईच्या विरहाने जसा रडतो. तसा तो गृहस्थ ढसाढसा रडायला लागला.
गोपाल - (पाणावलेले डोळे घेवून, धीर देण्यासाठी) काही मनात असेल तर बोलु शकता. मनात ठेवलेले दुःख सतत सलत राहते. आणि सांगितल तर हलक होतं. अशी माझी आई मला नेहमीच सांगते.
गृहस्थ - अश्रुनी भरलेल्या डोळ्याने गोपाल कडे बघु लागले. गोपाल कडे बघुन त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. पण तोंडातुन शब्दांचा पाऊस कोसळावा तसे ते पाण्याच्या थेंबा प्रमाणे धडाधड बोलु लागले. कधीकधी ओघाच्या भरात आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला सर्वकाही सांगुन जातो. तस येते घडलं. गोपालला त्या गृहस्थाने एकाद्या खळखळनाऱ्या  नाल्या प्रमाणे सगळे सांगून काही क्षणातच मोकळा झाला.
गृहस्थ - अवघड असतं रे बाबा, स्वतः चे स्वप्न दुसर्‍यासाठी  सोडुन आयुष्यभर जगणं. रोज थोड थोड काळीज झिजतं. आणि आपण आपल्या स्वप्नांचा घोटलेला गळा आठवण करून देते. वडिलाचे छत्र अचानक हरवले, मी मोठा,छोटी बहिण, भाऊ, आई खाणारी चार तोंड होती. दहावीत प्रवेश करण्यापुर्वी शाळा सोडली. कामाची लाज सोडून, मिळेल ते काम करायला लागलो. कारण माझ्या डोळ्या समोर भुकेने व्याकूळ झालेले चेहरे दिसत होते. सगळ्यांची भूक तृप्त करण्यासाठी पैसे कमवायला लागलो. म्हटल आपण नाही शिकलो तरी बहिण भावाला शिकवु. ते शिकले काय?अन मी शिकलो काय ? एकच आहे. म्हणुन एक मोठय़ा बंधुचे कर्तव्य पार पाडण्यात तिळ मात्र चुकलो नाही. दोघांनाही शिक्षक बनवलं. लग्न लावुन दिलं. पण नंतर ते त्यांच्या आयुष्यातं इतके रमले की,  नंतर माझ्याकडे फिरकलेच नाही. अवघड असतय दुसऱ्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करुन पैसा न पैसा जोडणं. माझं स्वप्नं मी विसरून मी त्यांच स्वप्नं पूर्ण करण्यात गुंतलो. बंधूनी दिलेल्या दुःखतून सावरण्यासाठी मुलामध्ये रमू लागलो. मला गायक व्हायचे होते. पण आलेल्या परिस्थितीमुळे होता आलं नाही. म्हटलं  मुलाला गायक बनवु. तो गायक झाला काय?अन मी झालो काय?सारखचं पडते. म्हणुन मुंबईतच शिकाला पाठवले. काही दिवसांनी त्याला या बाबाचा विसर पडला. आणि प्रेम विवाह करून तिकडेच स्थायिक झाला. काल त्याला अँवाँर्ड मिळाला. त्यात म्हणाला, याच सार श्रेय माझे गुरु आणि बायकोला जातं. त्याच्या बोलण्यात मी मला शोधत होतो रे! पण गम्मत बघ मी कुठच नव्हतो रे!
        मला पण वाटायच इस्ञीचे कपडे घालावे. एकदम टापटीप रहावे. पर रोज इस्ञिला 5 रुपय महिण्याचे 150. ते मुलाला खर्चायला होतील. म्हणुन कधीच आयुष्यात इस्ञीचे कपडे घातले नाहीत. मी पण माणूस आहे. मला पण वाटायच गाडी घ्यावी,पर पोराला काँलेज ला उशीर होतो आणि तास बुडतात म्हणुन त्याला गाडी घेवुन दिली. माझी ईच्छा, आकांक्षा, मौजमजा सगळे मी दाबून जगलो. सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं माहितीये , ज्याच्यासाठी त्याग केला त्यालाच त्याची जाणीव नसते तेव्हा. आता वाटतं काय कमवल मी आयुष्यात ? काहीच नाही.फक्त आणि फक्त मन मारत जगत आलो. आता माझ वय झालयं.मरणांच्या भिती ने रात्री ची झोप उडवली आहे. पूर्ण न झालेले, अर्धवट स्वप्न चैन पडु देत नाहीत. सारखे विचार डोक्यात येतात. मग बसतो समाधी सारखा टक लावुन तासंनतासं. यावर लोक पाहून म्हणतात याला वेड लागलयं. पण मी वेडा नाही रे खरचं. एक कलाकार कलेसाठी हळवा असतो इतकच. बाकी काही नाही. माझा आवाज ऐकवु का तुला ? म्हणजे कळेल मी वेडा नाही, कारण  मेलेल्या स्वप्नांच दुःख च इतक जड असत की वेडं झाल्या शिवाय पेलण्याची ताकत येतं नाही. बोलताना अश्रु वाहतच होते. चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. एवढ्या दिवसाची घुसमट बाहेर पडत होती. गोपालला त्यांची तळमळ बघुन गहीवरुन येत होतं. तितक्यात गृहस्थ तुला मी गाणं म्हणुन दाखवतो थांब..
गोपाल - हो ऐकवा ना.हो ऐकताच ते खुप खुश झाले. वर्षानुवर्षे होरपळलेल्या , घुटत आलेल्या एखाद्या कलाकाराला त्याची कला दाखवण्याची संधी मिळाली आणि त्याने ती न स्विकारावी तर नवलच. गृहस्थ आनंदाने गाणं म्हणायला तयार झाले. आजवर त्यांच गाण कुणीही ऐकल नव्हत.
     " तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं
       तेरे मासूम सवालों से, परेशान हूँ मैं
      जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे
      मुस्कुराये तो मुस्कुराने के, क़र्ज़ उतारने होंगे
    मुस्कुराऊं कभी तो लगता है, जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है
      तुझसे..."
                           

       त्यांचा आवाज खरच अफलातुन मनाला भुरळ घालणारा होता. त्यातले चढ उतार, आलाप मधुरता,कणखरपणा, हे सगळ पाहून. जणुकाही हे गृहस्थ म्हणजे रानटी हिरा.जो योग्य जोहरी न मिळाल्याने प्रसिद्धी पासुन कोसो दुर कड्या कपारीत दगडांमध्ये पडुन होता. एक वेगळा दुर्लक्षित दगड म्हणुन. आवाजाची किमया इतकी होती की झाडं, पानं, फुलं, वेली आणि गोपाल सर्व तृप्त होत होते. इतकावेळ दाटलेल ढग सुद्धा बरसायला लागले. जणुकाही एका सच्च्या रसीकाप्रमाणे गाण्यावर ते दाद देत होते. गृहस्थाचे दुःख , त्याची कथा आणि आवाजातील जादू ऐकुन वड सुद्धा रडत होता. पारंब्यातून अश्रुंच्या सरी बरसत होत्या. आभाळ कोसळत होतं. गोपाल आवाजात हरवला होता. तेवढयात बसच्या आवाजाने तो भानावर आला.
गृहस्थ - चल पोरा माझी बस आली.. येतो. लय बरं वाटलं बोलुन.गृहस्थ बस मध्ये बसुन निघुन गेले. गोपाल बसकडे बराच वेळ बघत होता. जणुकाही ती बस एका अज्ञात अवलीयाला घेवुन जात आहे , स्वतःच्या नकळत. आणि जाता जाता तो  अनामिक सुरांचा सम्राट खिडकीतुन आपल्या गाण्याचे बोल पावसाच्या सरीत मिसळण्यासाठी उधळत होता.


  गोपाल च्या मनात वादळ सुरु झालं. काही आठवणी आठवु लागल्या. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम. हातावरच पोटं. मुलगा - मुलगी असा भेद नव्हता, पण आई वडिलांनी गोपाल आणि त्याच्या बहिणीपुढे एक पर्याय ठेवला होता. आम्ही दोघांपैकी एकाच्याच शिक्षणाचा खर्च करु शकतो. तुम्ही दोघांनी आपआपसात ठरवा.कुणी शिकायचं ते ?त्यावर बहिण म्हणाली , गोपाल शिकवुया.ती गोपाल इतकीच हुशार होती  पण तिने त्याग केला आपल्या स्वप्नांचा,भावासाठी. गोपाल मनात एकच वाक्य घोळत होत , " वाईट याच वाटतं की ज्याच्यासाठी त्याग केला त्याला त्याची जाणीव नसते," गोपाल ने फोन काढला आणि बहिणीला फोन केला.
बहिण - हा गोपाल बोल बाळा,
गोपाल शांत,तिचा आवाज ऐकतबहिण - हँलो... बोल ना आवाज येतोय का ??
गोपाल - ताई.. तुझे मानावे तेवढे आभार कमी आहे. माझ्या साठी आपल्या स्वतः च्या स्वप्ना चा गळा घोटणाऱ्या बहिणीचा नेहमी आदर राहील.
बहिण -  गोपाल बाळा... अस म्हणताचा गोपालनी फोन कट केला. पाऊस उतरला होता. मोबाईल च्या स्क्रिन वरील पावसाचे थेंब त्याने  पुसले.आणि जुना हिरोईनचा वाँलपेपर काढुन ताईचा फोटो सेट केला. फोटोकडे बघुन गोड स्माईल केली. फोटोवर मायेने ओठ टेकवले. आणि मोबाईल  परत खिशात टाकला. तेवढयात काँलेज ला जाणारी बस आली आणि तो गेला. आपल्या आजुबाजुला, घरात अशी असंख्य माणसं असतात. जी नेहमी इतरांसाठी जगतात.सोप्प नसतं इतरांसाठी झुरणं आणि जगणं, सोप्प नसत समोरच्याच्या आनंदात आनंदी होणं. त्यासाठी खुप मोठ मन लागतं. अशी आगळीवेगळी माणसं जपायला हवी.तुमच्या पण आयुष्यात असाच कोणीतरी त्याग केलेला असतो. आता आयुष्याच्या या वळणावर तरी त्यांची आठवण तरी ठेवा. एक वेळ कृतज्ञ नाही राहिलात तरी चालेल पण निदान कृतघ्न तरी होऊ नकात.
 

                       - अविनाश वाघमारे 

16 टिप्पण्या

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अविनाश सर खुप अप्रतिम असा लेख आहे. .
    Inspire pn ahe & janiw pn krun deto

    उत्तर द्याहटवा
  3. उणीव नसली तरी चालते पण जाणीव असावी लागते 👌👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने